खासगी शिकवणींवर कारवाईची मागणी:युवक काँग्रेसचे तळेगाव नगरपरिषदेला निवेदन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: शहरातील काही शिक्षकांकडून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर खासगी शिकवणी वर्गांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण हे समाज प्रगतीचे प्रभावी माध्यम असून त्यामध्ये पारदर्शकता, समानता आणि नैतिक मूल्ये टिकवणे आवश्यक आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले.

 

महाराष्ट्र कर्मचारी सेवा नियमांतील कलम २२ नुसार शाळेतील शिक्षकांनी व्यावसायिक स्वरूपात खासगी शिकवणी घेणे नियमबाह्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शहरातील काही भागांत शिक्षकांकडून खासगी शिकवणी वर्ग घेतले जात असल्याच्या तक्रारी पालक व नागरिकांकडून सातत्याने येत असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक असमानता वाढत असून पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

Advertisement

 

या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. सर्व शाळांना शिक्षकांकडून लेखी हमीपत्र घेण्याच्या सूचना द्याव्यात, ज्यामध्ये संबंधित शिक्षक कोणत्याही खासगी शिकवणी वर्गाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करतील, अशी मागणी करण्यात आली. तसेच तक्रारींची नोंद व पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळास्तरावरच पूरक मार्गदर्शन व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना बाहेरील शिकवणींची गरज भासणार नाही, अशी भूमिकाही युवक काँग्रेसने मांडली. आज घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय उद्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करतील.असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

 

या वेळी तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज, तालुका सरचिटणीस राजीव फलके, संपर्कप्रमुख राजू शिंदे, मावळ तालुका सरचिटणीस किरण मोकाशी यांच्यासह स्वप्निल निकाळजे, सिराज खान, सिद्धांत वाळुंज, संगमेश पाटील, बाळू बाबू गवडा, नितीन माने, लोंढे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page