तळेगावत झोपड्यांचा बेकायदा विस्तार: पोलिस व नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : शहरात खाजगी तसेच सरकारी जमिनींवर अनधिकृत झोपड्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, या झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची कोणतीही अधिकृत नोंद पोलिसांकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शहरातील विविध मोकळ्या जागांवर उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपान, आरडाओरडा आणि गोंधळ सुरू असतो. यामुळे परिसरातील कुटुंबांना शांततेत राहणे कठीण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या प्रकारांचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

 

याचबरोबर या झोपड्यांमध्ये राहणारे नागरिक उघड्यावर नैसर्गिक विधी करत असल्याने परिसरात अस्वच्छता आणि तीव्र दुर्गंधी पसरत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. मात्र, या संपूर्ण परिस्थितीकडे पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

 

दरम्यान, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने पहाटेच्या वेळेत गुड मॉर्निंग पथका मार्फत अशा ठिकाणी धाड टाकून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी नगरसेवक किशोर छबुराव भेगडे यांनी आपल्या कार्यकाळात अशा पथकांच्या माध्यमातून अनेक भागांत कारवाया राबवल्या होत्या. त्या वेळी उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा मोहिमा बंद पडल्याने पुन्हा अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page