धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला; अखंड मराठा समाजाची कठोर कारवाईची मागणी
पुणे : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका जाहीर धार्मिक कार्यक्रमातील कथित वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, या प्रकरणाची दखल घेत अखंड मराठा समाज, महाराष्ट्र राज्य (पुणे जिल्हा) यांनी संबंधित वक्त्याविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित वक्तव्य हे समाजात तणाव निर्माण करणारे व सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे असल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेली विधाने ही समाजात जातीय तेढ वाढवणारी असून, इतिहासाचे कथित विकृतीकरण करून जनतेमध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही राजकीय मान्यवरांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मंत्री, मुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेत्यांनी संबंधित वक्तव्यांवर तात्काळ आक्षेप नोंदवला नाही, यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे मूक संमती दिली का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या व्यासपीठावरून वादग्रस्त विधानांना वाव देणे आणि त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अखंड मराठा समाजाने या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. समाजात वैमनस्य निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणे, धार्मिक व ऐतिहासिक भावना दुखावणे तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल असे उत्तेजक विधान करणे, यांसारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. तसेच, दंगली भडकवण्याचा प्रयत्न आणि संघटितरीत्या गुन्ह्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात पुणे येथील डीसीपी ऋषिकेश रावले यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन देत सांगितले की, संबंधित घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी सखोल चौकशी करण्यात येईल आणि पुढील दोन दिवसांत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संघटनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, या प्रकरणात कठोर व उदाहरणार्थ कारवाई झाली नाही, तर भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना चालना मिळू शकते. समाजात स्थैर्य आणि सलोखा राखण्यासाठी तातडीने गुन्हा नोंदवून निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात तीव्र चर्चा सुरू झाली असून, विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी अनिकेत शंकर देशमाने, बाबुराव धोंडिबा भोर, अर्चना शहा (भिवरे पाटील), दत्ता पवार तसेच मराठा सेवक मावळचे नरेंद्र (बंटी) मुर्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






