मावळ मधील दुर्दैवी घटना ! बास्केटबॉल पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

SHARE NOW

इंदोरी  :

शैक्षणिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी इंदोरी येथे घडली. तोलानी मेरीटाईम इंडस्ट्रीच्या क्रीडांगणावर बास्केटबॉल खेळताना लोखंडी पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मृत विद्यार्थ्याचे नाव विशाल वर्मा (वय २०) असे असून तो इंदोरी येथील विद्यार्थी वसतिगृहात राहत होता. त्याचे मूळ गाव अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तोलानी एचडी आवारातील बास्केटबॉल मैदानावर विद्यार्थी नेहमीप्रमाणे सराव करत होते. खेळ रंगात आलेला असतानाच अचानक ही दुर्घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खेळादरम्यान विशाल वर्मा हा बास्केटबॉलच्या रिंगला लटकला असता रिंग अचानक तुटली. त्याच वेळी संपूर्ण लोखंडी पोल जोरात कोसळून थेट त्याच्या अंगावर पडला. या भीषण अपघातात विशाल गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर काढत तातडीने तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Advertisement

 

मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता काळे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी या घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

 

दरम्यान, या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. क्रीडांगणावरील उपकरणांची देखभाल योग्यरीत्या न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, घटनेची माहिती पोलिसांना देण्यास कॉलेज प्रशासनाकडून विलंब झाल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

 

या उशिरामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल तीन तासांचा विलंब झाल्याचे समोर आले असून, या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रीडांगणातील सुरक्षेचे निकष कितपत पाळले जातात, याचा आता सखोल तपास होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page