कुतूहल यशाचा मार्ग समृद्ध करते – चेतन जोशी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चतु:सूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. शिस्त, लवकर सुरुवात, कुतूहल आणि कृतज्ञता ही चार सूत्रे विद्यार्थ्यांना यशाकडे घेऊन जातात, असे मत हायकुल इलेक्ट्रॉनिक चे सर्वेसर्वा व ख्यातनाम उद्योजक चेतन दोशी यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए व बीसीए विभागाच्या सांस्कृतिक महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व नामांकित उद्योजक रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, यशोदा महादेव काकडे इंजीनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, बीबीए बीसीए विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. विद्या भेगडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदिप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

पुढे बोलताना जोशी म्हणाले की, कुतूहलापोटी विद्यार्थी जिज्ञासू होतो. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यातून ज्ञान मिळते व यशाचा राजमार्ग समृद्ध होतो. यशासाठी कुठलाही शॉर्टकट नसून कष्टपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक कृतिशीलतेतून निश्चितच यश संपादन करता येते, असा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

Advertisement

 

त्यावेळी बोलताना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की, विद्यार्थी हा विनयशील असला पाहिजे. नम्रता हा गुण विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ठरवून देणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी हा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत घडतो, असे गौरवोद्गार काकडे यांनी काढले. शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जगाच्या बाजारात आपला विद्यार्थी उभा राहावा यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्था कायम बांधिल असल्याचे प्रतिपादन यावेळी काकडे यांनी केले.

 

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, इंद्रायणी महाविद्यालय कायमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक या दोन्हीही गोष्टी महाविद्यालयीन जीवनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात म्हणूनच असे सांस्कृतिक महोत्सव व भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. यावेळी यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व आणि आपला अभ्यास या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे यांनी केले. त्यांनी क्रीडा आणि इतर कौशल्य विकासात्मक कार्यक्रमातून विद्यार्थी कसा घडतो हे सांगत कलागुण, क्रीडा शक्ती आणि मानसिक तंदुरुस्तीतून विद्यार्थ्यांच्या जगण्याला परिपूर्णता प्राप्त होते असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विभागाच्या उज्वल आणि यशस्वी परंपरेचा परिचय उपस्थित मान्यवरांना करवून दिला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्वी श्रीनिवास यांनी केले तर आभार प्रा. नम्रता वावरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि विभागप्रमुख,प्राध्यापक, प्राचार्य व संस्था पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बीबीए/ बीसीए विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page