तळेगाव दाभाडे चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यात्रेनिमित्त तळेगावात वाहतूक बदल:
तळेगाव दाभाडे :
येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त १९ ते २५ मार्च या कालावधीत तळेगावात वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने हे तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
मंदिर परिसरातील प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिजामाता चौक व सुभाष चौक या दोन्ही बाजूंनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली असून, या भागात केवळ पादचाऱ्यांनाच प्रवेश राहणार आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, मारुती मंदिर चौक, जुनी नगर परिषद इमारत, संभाजी नगर, नालबंद गल्लीमार्गे गणपती चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे. घोरवाडी रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या वाहनांनी गणपती चौकातून डावीकडे वळून मारुती मंदिर चौकामार्गे पुढे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली असून, त्यांच्यासाठी मार्ग मोकळा ठेवण्यात येणार आहे.
तळेगाव वाहतूक विभागामार्फत विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश लोंढे यांनी केले आहे.
हे सर्व बदल १९ मार्च रोजी पहाटे ६ वाजल्यापासून २५ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.






