कष्टकरी कुटुंबातील लेकीची ‘सीए’पर्यंत झेप; वृषाली राक्षेचे यश
शिरगांव :
कष्टकरी कुटुंबातील मुलगी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करू शकते, याचे उत्तम उदाहरण शिरगाव येथील वृषाली राक्षे हिने घालून दिले आहे. आई शाळेत सफाई कामगार तर वडील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक असतानाही वृषालीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही अत्यंत कठीण व प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश मिळविले आहे. तिच्या या यशाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
मावळ तालुक्यातील शिवली हे वृषालीचे मूळ गाव असून नोकरीनिमित्त तिचे कुटुंब शिरगाव येथे वास्तव्यास आहे. तिचे प्राथमिक शिक्षण शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेत झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आमदार प्रकाश देवळे विद्यालय, शिरगाव येथे पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच ती अभ्यासू, शिस्तप्रिय व ध्येयवेडी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती.
२०१८ मध्ये वृषालीने सीए फाउंडेशन परीक्षेची तयारी केली होती; मात्र पहिल्याच प्रयत्नात तिला अपयश आले. या अपयशाने न खचता तिने अधिक जोमाने अभ्यास सुरू ठेवला. २०२० मध्ये तिने सीए इंटरमिजिएट परीक्षा व आर्टिकलशिप पूर्ण केली. त्यानंतर अंतिम परीक्षेची तयारी करताना तळेगाव दाभाडे येथील गणेश वाचनालयात दररोज सुमारे बारा तास अभ्यास करून तिने जानेवारी महिन्यात झालेल्या अंतिम परीक्षेत यश संपादन केले.
या संपूर्ण प्रवासात तिला सीए ज्ञानेश्वर गोपाळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने मिळविलेल्या या यशामुळे वृषाली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
दरम्यान, वृषाली राक्षे हिच्या या यशाबद्दल शिरगाव येथील शारदाश्रम व देवळे विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यवाह रवी जाधव, कल्पना कविटकर, उमेश कविटकर, मुख्याध्यापक विजय लोखंडे, मुख्याध्यापक रमेश फरताडे तसेच शिक्षक मच्छिंद्र कापरे, हनुमान सुरनर, संतोष चव्हाण, बद्रीनारायण पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वृषालीच्या यशाबद्दल तिची आई सुभद्रा चंद्रकांत राक्षे म्हणाल्या, “वृषाली लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. बारा-बारा तास अभ्यास करून तिने सीएसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून आमच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढविला.”
आपल्या यशाबद्दल बोलताना वृषाली राक्षे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांचे अथक परिश्रम आणि गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळवू शकले.”






