सिमेंट मिक्सर आणि डम्परांच्या बेधडक धावण्यामुळे अपघातांचा धोका वाढला

SHARE NOW

देहुरोड: पिंपरी-चिंचवड शहरासह जुना पुणे–मुंबई महामार्गावर अवजड वाहनांची, विशेषतः सिमेंट मिक्सर, डम्पर आणि गौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनांची बेधडक वाहतूक वाढली असून त्यामुळे गंभीर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.देहुरोड. हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, निगडी, मोशी आणि भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी ही वाहने वापरली जात आहेत. मात्र, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

 

अनेक सिमेंट मिक्सर आणि डम्पर वाहनांवर स्पष्ट नंबरप्लेट नसणे, अथवा सिमेंट व मातीच्या थरामुळे नंबरप्लेट झाकली जाणे, हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे अपघात झाल्यास संबंधित वाहन ओळखणे कठीण होत असून दोषींवर कारवाई करणे जवळपास अशक्य ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंजवडी फेज-१ आणि फेज-२ परिसरात मिक्सर वाहनांच्या अपघातांची मालिका सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी सोमाटणे फाटा येथे सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका उच्चशिक्षित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही.

Advertisement

 

जुना पुणे–मुंबई महामार्ग, वाकड–ताथवडे मार्ग तसेच मोशी–आळंदी रस्त्यावर ही अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी आणि चारचाकी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही अपघातांनंतर चालक वाहनासह फरार झाल्याच्या घटनाही समोर आल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

वाहतूक नियमांनुसार प्रत्येक वाहनावर स्पष्ट, वाचता येईल अशी नंबरप्लेट असणे बंधनकारक आहे. मात्र, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) निष्क्रियतेमुळे या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी असतानाही या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, शहरातील अपघातांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page