देहू नगरपंचायतीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
देहूगाव :
तीर्थक्षेत्र देहूत दररोज वाढणाऱ्या भाविकांच्या ये-जा लक्षात घेता, त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी नगरपंचायत प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. याचबरोबर देहूतील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्यांवरही प्रशासन गांभीर्याने काम करत असल्याचे देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोंडे म्हणाले की, “जसा निधी प्राप्त होईल, त्यानुसार विकासकामांना गती दिली जात आहे. आगामी काळात नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यास अधिक निधी उपलब्ध होऊन देहूगावचा सर्वांगीण विकास साधता येईल.”
८ डिसेंबर २०२० रोजी देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. तद्नंतर एका वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर १७ नगरसेवक निवडून आले. पंचायतीच्या पाच वर्षांच्या इतिहासात प्रथमच वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
सोमवार (ता. ८) रोजी देहूनगर पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम आणि नगराध्यक्ष पूजा दिवटे यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. करसंकलन विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे, नगरसेविका पूनम काळोखे, नगरसेवक योगेश काळोखे, माऊली काळोखे, योगेश परंडवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका, तसेच देहूनगर पंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासकामांची आणि आगामी योजनांची माहिती देण्यात आली असून, पुढील काळात देहूचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






