ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन व विद्यार्थी दिवस उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :

वंदे मातरम गीताचा १५० व्या वर्धापन दिनानिमित्त व विद्यार्थी दिवस या कार्यक्रमाचे निमित्ताने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिरामध्ये वंदे मातरम गीताचा सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे साहेब, दत्ता बनसोडे साहेब, सुनंदा जाधव मॅडम, काजल किरवले, स्वाती टेमकर मॅडम, हुडगिरी मॅडम, विशाल ओव्हाळ, प्रवीण गायकवाड, चेतन धोंडी, जितेंद्र पाटील, सोनाली शिंदे, शिक्षक प्रतिनिधी संपत गोडे, सौ आशा आवटे, ज्येष्ठ शिक्षक श्री राम कदमबांडे , सौ रजनी बधाले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते भारत मातेच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचा विकासाचा कितीवृत्तांत शाळेचे मुख्याध्यापक श्री पोटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला. आधुनिकतेची कास धरत आणि भारतीय इतिहासाचा वारसा जपत विज्ञान तंत्रज्ञान यांचा वापर करून डिजिटल स्मार्ट बोर्ड याच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश सारखा उपक्रम विद्यालय राबवत आहे. तर प्राचीन भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेला योग, ध्यानधारणा आणि मेडिटेशन यांनी शालेय दिनक्रमाची सुरुवात करून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, एकाग्रता, शरीरसंवर्धन या गुणांची रुजवणूक केली जाते. विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून श्री पोटे सर पुढे बोलताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनांक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यामागील प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व निष्ठेचे स्मरण करून ज्ञान विषयक ओढ व आवड निर्माण करणे. बाबासाहेबांची आजीवन विद्यार्थी म्हणून जगणे ही सर्वांसाठी प्रेरणा आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रवीण कांबळे साहेब म्हणाले शाळा या देशाचे भविष्य घडविणारे मंदिरे आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता, संस्कार, शिस्त, आणि सामाजिक जबाबदारीचे भान यांसारखी जीवनमूल्य नैसर्गिक रित्या रुजवली जातात. शाळेतील पोषक वातावरणामुळे भविष्याचे निरोगी आधारस्तंभ तयार होतात. तसेच कांबळे साहेब यांनी विद्यार्थी दिवस निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, परांजपे विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वंदे मातरम गीताचे समूह गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले. शाळेची भौतिक सुविधांमधील संपन्नता, बौद्धिक, संस्कृतिक, क्रीडा क्षेत्रांमध्ये विद्यालयाने मिळवलेले यश, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक व पोषक वातावरण, विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या, अशा अनेक शाळेच्या वैशिष्ट्यांना सभापटलासमोर मांडत सुवर्णा काळडोके यांनी उपस्थित मान्यवरांचे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






