मराठ्यांच्या स्वराज्याची दुर्ग गौरवगाथा जागतीक वारसा यादीत समाविष्ठ…
मावळ :
छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्यूकेशन सायंटीफिक अँड कल्चरल ऑरगनायजेशन. स्थापना : 16 नोव्हेंबर 1972) या जागतिक वारसा यादीत आज समाविष्ट झाले. यात महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व पन्हाळा असे आकरा दुर्ग व तामिळनाडू मधील जिंजी हा एक दुर्ग समाविष्ट झाला.
जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्याची प्रमुख तीन कारणे आपल्या समोर प्रकर्षाने मांडायची आहेत.
प्रथम म्हणजे लपविलेली महाद्वारे ही अगदी विशिष्ट्यपूर्ण आहेत. द्वाराबाहेर आपले सैनिक उभे राहिले तरी शत्रूसैन्याला ते दिसणार नाहीत. अशी व्यवस्था परकीय कोणत्याही राष्ट्रातील दुर्गात दिसून येत नाहीत. राज्यव्यवहार कोष जो महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी धुंडीराज लक्ष्मण व्यास व रघुनाथपंत हनमंते यांना आज्ञा देऊन बनवून घेतला त्यात महाद्वारात काय योजना चालू आहे ती शत्रूस समजू नये म्हणून द्वार एका भिंतीने झाकून घ्यायचे आणि त्या भिंतीस “जिभी” असे संबोधावे असे म्हटले आहे. हीच रचना जागतिक आश्चर्य ठरली.
द्वितीय म्हणजे जगातील इतर कोणत्याच देशातील दुर्गाना माची रचना नाही. माची हे वैशिष्ट्य नेमके काय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात थेट अष्टप्रधान मंडळात सेवेत असणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी लिहिलेल्या “आज्ञापत्र” या ग्रंथात महाराज साहेबांची नीती थेट ते नमूद करतात, “दुर्गा शेजारी दुसरा पर्वत त्या सामुदायी असू नये. शक्य असल्यास पाडून टाकावा तथा शक्य नसल्यास बांधून काढावा.” यात डोंगरांची लांब पसरलेली सोंड जी असतें ती बांधून घेण्यात आली आणि त्यास उपदुर्ग असे देखील संबोधले गेले. आज आपण बोलिभाषेत सर्व त्यास “माची” संबोधतो. हे एक खासे वैशिष्ट्य ठरले.
तृतीय अगदी महत्वपूर्ण म्हणजे शिवप्रेमी वर्ग व दुर्ग संवर्धक संस्था होय. तहहयात इतिहासात गढून गेलेले अनेक शिवप्रेमी आहेत ज्यांनी इतिहास विषय कायम ढवळून काढीत तो इतिहास जमा न होऊ देता जिवंत ठेवला. नव्या भौतिकवादी व व्यवसायिक जगात मुलाबाळांच्या हक्काचा वेळ व त्यांच्या तोंडचा घास उभी हयात सह्याद्रीत घालविलेली शिवप्रेमी मंडळी ही आजच्या विजयाची खरी हकदार आहेत. दुर्गावर रात्रंदिन राबणारी मंडळी दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था ज्यात बजरंग दल – विश्वहिंदू परिषद, सह्याद्री प्रतिष्ठान, श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, संपर्क बालग्राम संस्था, गडभटकंती वडगाव मावळ, शिवाजी ट्रेल व दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य तसेंच आणिक कित्येक संस्था ज्या दुर्ग संवर्धन करीत आहेत त्यांचे योगदान या विजयात खरेच मोठे आहे.
केंद्रीय पुरातत्व विभाग, भारत सरकार व पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेंच दोन कार्यक्षम अधिकारी म्हणजे श्री. तेजसकुमार गर्गे सर व श्री. विलास वाहने सर तसेंच या दोहोंची संपूर्ण टीम यांनी केलेल्या श्रमाची पराकाष्टा व अंतिम महत्वाचे म्हणजे लोहगड ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या शुभेच्छामुळेच सदर बारा दुर्ग जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाली आहेत.
भारत सरकारने, “भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले” युनेस्को मध्ये समाविष्ट व्हावे अशी शिफारस केली, भारतीय शिष्टमंडळाने पॅरिस येथे युनेस्को समिती समोर सादरीकरण करताना “अद्वितीय वैश्विक मूल्य” अशी मांडणी करून आज जगाच्या नकाशावर मराठ्यांचे बारा दुर्ग जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाले ही गोष्ट काही सामान्य झाली नाही…
आज प्रत्येक भारतीयाने, मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर बारा दीप लावून पूजन करावे…
इतिहास संशोधक
डॉ. प्रमोद बोराडे






