सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ. गौरीताई महाराज सांगळे पंढरपूरकर यांचे वृंदा गुरुकुल फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

SHARE NOW

देहूगाव :

शिवराज सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप; शिवशाहीर शंकर महाराज सांगळे यांचे गीतातून समाजप्रबोधन

 

वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमीमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनकार सौ. गौरीताई महाराज सांगळे पंढरपूरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले.

 

“आजच्या काळात विद्यार्थ्यांचे फाउंडेशन मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. बेसिक स्किल्स, स्किल डेव्हलपमेंट आणि प्रत्यक्ष जीवनात ज्ञानाचा उपयोग करता येणे महत्त्वाचे आहे. फक्त पुस्तकी अभ्यास न करता विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून पुढे गेले पाहिजे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यात हवे ते यश मिळवता येते. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सौ. गौरीताई महाराज सांगळे यांनी वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अबॅकस, फोनिक्स, हॅन्ड रायटिंग, स्पोकन इंग्लिश, जर्मन लँग्वेज, जापनीज लँग्वेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तसेच मंथन, नवोदय व स्कॉलरशिप तयारी या विविध शैक्षणिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे ज्ञानदानाचे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात ही संस्था अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

 

महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या सौ. गौरीताई महाराज सांगळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, संस्कार आणि ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा दिली.

 

या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे सौ. गौरीताई महाराज सांगळे यांनी आपला मुलगा शिवराज सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले तसेच अल्पोपहाराचे आयोजन केले. वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा सांगळे कुटुंबीयांचा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

 

यावेळी शिवशाहीर शंकर महाराज सांगळे यांनी महाराष्ट्रगीत व विविध गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत विनोदी शैलीत समाजप्रबोधन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

सांगळे कुटुंबीयांचे समाजकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली भावना खरोखर आदर्श घेण्यासारखी आहे, असे मत वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमीचे फाउंडर डायरेक्टर प्रा. रुपेश फोंडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सौ. गौरीताई महाराज सांगळे पंढरपूरकर व सांगळे कुटुंबीयांचे आभार मानले.

 

यावेळी सौरभी फोंडे, सलोनी रोकडे, श्री. अमोल कारंडे, श्री. अमोल तौर, सार्थक हराळे यांच्यासह विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page