*युवक हे राष्ट्राची संपत्ती आहेत – विनोद बन्सल.* *यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘यशोगाथा’ विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.*
*पिंपरी :
रविवार,दिनांक 26 जानेवारी 2025* : युवक हे राष्ट्राची खरी संपत्ती असून युवकांनी विद्यार्थी दशेपासूनच आपले व्यक्तिमत्व संपन्न करण्यासाठी महान व्यक्तींच्या आत्मचरित्रांचे वाचन करून त्यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन जयश्री पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण सोहळ्यानंतर यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन केल्यानंतर ते विद्यार्थ्यांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या युवावस्थेमध्ये स्वतःला व्यसनांपासून आणि चुकीच्या सवयींपासून कटाक्षाने दूर ठेवावे आणि आपले आरोग्य सुदृढ कसे राहील या दृष्टीने प्रयत्नशील राहावे, अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवण्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा;
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे काम समजून घेऊन त्यांच्या कार्यात स्वतःला सहभागी करून घेण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प करावा, असे आवाहनही विनोद बन्सल यांनी केले.
यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांविषयीची संक्षिप्त माहिती देत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी, अमला करंदीकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग, एमबीए व एमसीए चे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, स्वप्निल देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.