ठाकूरसाई-जवण रस्ता : सहा कोटींचं विकासकाम की सहा कोटींचा घोटाळा?
पवना नगर,
मावळ तालुक्यातील ठाकूरसाई ते जवण हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला. मात्र, केवळ एक वर्षातच या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, हा विकासकामाचा नमुना कमी आणि भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा अधिक वाटतोय.
रस्त्याचे विदारक चित्र म्हणजेच
१०० ते १५० खड्डे,
अनेक ठिकाणी रस्ता खचलेला,
प्रवाशांच्या जीवाला धोका,
आणि दररोज होणारी वाहतूक कोंडी व अपघात.
नागरिकांचा संतप्त सवाल –
> “६ कोटींची मलाई नेमकी कुणी खाल्ली?”
हा प्रश्न केवळ ग्रामस्थांचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
जबाबदारी कुणाची?
या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतात तेव्हा ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि प्रशासन यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडते. एवढा निधी खर्च होऊन रस्ता वर्षभरातच मोडतो म्हणजे नक्कीच कुठे तरी मोठं अपयश किंवा दुर्भावना आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
गावकऱ्यांचा उपरोध –”कुंपणच शेत खातंय का?”
ही केवळ एक उपरोधिक टीका नाही, तर व्यवस्थेतील पोकळपणावर मारलेली अचूक कोरडी टीका आहे.
मागण्या काय आहेत?
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन युवा आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष संदीप कदम यांनी शासनाकडे तीन स्पष्ट मागण्या केल्या आहेत:
1. रस्त्याच्या दर्जाची तात्काळ व स्वतंत्र तपासणी करण्यात यावी.
2. दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
3. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी.
जर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर याचे परिणाम केवळ रस्त्याच्या गुणवत्तेपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर लोकशाहीतील विश्वासालाही तडा जाईल. “सहा कोटींचा रस्ता” ही घोषणा न राहता, तो एक सहा कोटींचा घोटाळा ठरू शकतो.






