सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांनी घरातील कचरा टाकायचा कुठे ? दिवसातून दोन वेळ कॉम्पॅक्टरची व्यवस्था करा, पण कचराकुंडी ठेवा राजेंद्र जगताप यांची मागणी

SHARE NOW

पिंपरी, प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना घंटागाडीच्या वेळेत पोहोचणे कठीण होऊन बसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही, अशी महापालिकेची अपेक्षा होती. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे, नोकरदार यांना महापालिकेच्या घंटागाडीची वेळ गाठता येत नाही. त्यामुळे असे नागरीक सकाळी कामाला जाताना किंवा कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. पण कचराकुंडीच नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी कचराकुंड्या काढून टाकल्या असल्या तरी घंटागाड्या वेळेवर येऊनही रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला दिसणार आहे.

Advertisement

मुंबई -पुणे शहरातील रस्ते जसे रात्री साफ केले जातात. त्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर, उपनगरांमध्ये केल्यास आणखी स्वच्छता राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.

—————————————–

स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रथम क्रमांक व देशात सातवा क्रमांक आला आहे. हे सातत्यपूर्ण यश टिकवण्यासाठी रस्त्याच्या कडेला कचरा पडणार नाही, याची दक्षता महापालिकेने घेणे आवश्यक आहे. यासाठी किमान ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरून कामावर जाताना किंवा कामावरून आल्यानंतर या लोकांना कचरा टाकण्याची सोय होईल. तसेच या कचरा कुंड्यातील कचरा उचलण्यासाठी दिवसातून दोन वेळा कॉम्पॅक्टर आल्यास कचराकुंड्यातील कचरा अस्ताव्यस्त होणार नाही. – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, पिंपळे गुरव


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page