पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान पीसीसीओईआरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पिंपरी, पुणे (दि. १८ जानेवारी २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची निकालाची परंपरा, महाविद्यालयाने मिळवलेले एनबीएचे मानांकन तसेच नॅकचे “ए प्लस प्लस” मानांकन, विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीसाठी केलेले विविधांगी प्रयत्न अशा अनेक कठोर निकषांवर ही स्वायत्तता पीसीसीओईआरला देण्यात आली आहे. या स्वायत्ततेनुसार पीसीसीओईआरला तंत्रज्ञान व व्यावसायिकता यावर आधारित स्वतःचे अभ्यासक्रम निर्माण करून उत्कृष्ट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभियांत्रिकी विद्यार्थी घडवण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
स्वायत्त महाविद्यालयात आदर्श अभ्यासक्रम कसा असावा यासाठी पीसीसीओईआरच्या ४५ प्राध्यापकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्राध्यापकांना हे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थानचे तज्ज्ञ (एनआयटीटीटीआर) हैदराबाद विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. उमाशंकर साहू, प्राध्यापक व्ही. सिवाकुमार आणि ग्रामीण, उद्योजकता विकास विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. गिरिधरन यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासक्रम निर्मितीमागील शास्त्र, संरचना, आउटकम बेस्ड एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० तसेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीवर आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
स्वायत्ततेमुळे शैक्षणिक दर्जा, नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी मदत होईल. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. स्वायत्ततेमुळे शिक्षणात अमुलाग्र बदल घडून येतील असे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी म्हणाले. यासाठी स्वायत्ततेचे समन्वयक डॉ. राहुल मापारी व स्वायत्तता प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक डॉ. सुदर्शन बोबडे यांचेही मार्गदर्शन केले.
पीसीसीओईआरला स्वायत्तता मिळाल्याबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पदमाताई भोसले, सचिव, विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व अध्यापक व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.