पत्नीच्या हातून सामाजिक कार्यकर्त्याचा खून; चिंचवड हादरले. पतीच्या चारित्र्य संशयातून मध्यरात्री घडली रक्तरंजित घटना

SHARE NOW

पिंपरी चिंचवड : समाजातील अन्यायाविरुद्ध नेहमी आघाडीवर असणारा, तरुणाईचा चेहरा ठरलेला सामाजिक कार्यकर्ता नकुल आनंदा भोईर (वय ४०) काल मध्यरात्री स्वतःच्या घरातच मृतावस्थेत सापडला. धक्कादायक म्हणजे, त्याची पत्नी चैताली भोईर (वय २९) हिनेच पोलिसांना फोन करून “मीच खून केला” असा कबुलीस्वरात घटनाक्रम सांगितला. या घटनेने माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला. नकुल भोईर यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हे वाद वाढले. चैतालीने संतापाच्या भरात कपड्याच्या सहाय्याने नकुल यांचा गळा आवळून त्यांचा खून केला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असून, आरोपी पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिस तिची चौकशी करत असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 

नकुल भोईर हे शहरातील विविध सामाजिक चळवळीत कायम आघाडीवर होते. नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. लिंकरोड परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरण रक्षण, तसेच तरुणांना व्यसनमुक्तीबाबत जागरूक करण्यासाठी त्यांनी अनेक मोहीमा राबवल्या होत्या. सामाजिक क्षेत्रातील त्यांची ओळख प्रामाणिक, स्पष्टवक्ते आणि जनतेसाठी लढणारे कार्यकर्ते अशीच होती.

Advertisement

 

पती-पत्नी दोघेही आगामी महापालिका निवडणुकीत भाग घेण्याच्या तयारीत होते. काही दिवसांपूर्वीच पाडव्याच्या निमित्ताने मोरया गोसावी मंदिराशेजारी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. शहरभरात मोठमोठी पोस्टर्स, होर्डिंग्स लागली होती, ज्यातून चैताली भोईर यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली होती. परंतु या सर्व उत्साहावर मध्यरात्री रक्तरंजित पडदा पडला.

 

भोईर यांच्या मृत्यूने चिंचवडमधील सामाजिक वर्तुळात एकदम खळबळ उडाली आहे. “जो स्वतः समाजातील अन्यायाविरुद्ध झगडत होता, तोच घरगुती वादाच्या भडका उडाल्याने बळी ठरला,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

नकुल भोईर यांच्या कार्याचा ठसा शहरभर होता. त्यांनी अनेकदा प्रशासनाच्या त्रुटींवर जोरदार टीका केली होती. “सामाजिक प्रश्न सोडवायचे असतील तर रस्त्यावर उतरावे लागते” हा त्यांचा मंत्र होता. पण त्याच रस्त्यावर लढणारा हा योद्धा स्वतःच्या घरातील वैवाहिक संघर्षात हरला, ही गोष्ट लोकांना चटका लावून जाते आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईर दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद वाढले होते. नकुल यांचा स्वभाव थोडा तापट असल्याने घरात भांडणाचे वातावरण नेहमीच तयार होत असे. काल रात्रीचा वाद मात्र इतका वाढला की, चैतालीने संतापाच्या भरात धक्कादायक निर्णय घेतला.

 

या घटनेनंतर चिंचवडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. “समाजासाठी लढणारा कार्यकर्ता गेला, तेही पत्नीच्या हातून,” अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे “मानसिक ताण-तणाव, कौटुंबिक भांडण” यावर जनजागृती मोहिम राबविण्याची मागणी केली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चैताली भोईर हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page