इंद्रायणी विद्या मंदिर, कांतिलाल शाह विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी विद्या मंदिर, कांतिलाल शाह विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा. श्री. गणेश काकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. तसेच प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू कु. सिद्धी लोणकर या सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, जोशपूर्ण नृत्याविष्कार व अर्थपूर्ण भाषण यांमधून राष्ट्रप्रेमाची भावना प्रभावीपणे व्यक्त झाली.

या प्रसंगी मा. श्री. शैलेश शाह सर यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर स्वच्छ व हरित ठेवण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली.
स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शाळेच्या आवारातून वतन नगर, इंद्रायणी कॉलनी, स्वप्ननगरी, हॉस्पिटल कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत इयत्ता ६ वी ते ९ वीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

हा प्रजासत्ताक दिन सोहळा देशभक्तीबरोबरच कृतीतून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला असून, विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये जपण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.






