● *अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला तळेगावमध्ये ‘विक्रमी’ प्रतिसाद* ● *मावळातील भगिनींच्या उदंड प्रेमाने भावूक झाले सुनिल आण्णा!*

तळेगाव दाभाडे, 16 ऑगस्ट – राज्यातील बहिणींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे मला कोणी काहीही करू शकत नाही. मी महाराष्ट्रभर फिरत राहणार आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव दाभाडे येथे व्यक्त केला. मावळ एवढे भगिनींचे प्रेम आतापर्यंत कुठेही मिळाले नाही, ते मी कधीही विसरु शकत नाही. जनतेची अशीच साथ कायम राहिली तर राज्याचा आणि मावळचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे आज तळेगाव दाभाडे येथे अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी यावेळी विक्रमी गर्दी केली होती. सभास्थानी जागा अपुरी पडल्यामुळे बाहेरचे रस्ते देखील महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते.

थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मावळचे आमदार सुनिल शेळके तसेच सुरेश घुले, प्रदीप गारटकर, संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष संतोष भेगडे, बाबुराव वायकर, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, सुरेश चौधरी, गणेश ढोरे, शंकरराव शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, सारिका शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध समाज घटकातील महिलांनी अजितदादांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

अजित पवार म्हणाले की, माझ्या जीवाला धोका असल्याचा इशारा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील भगिनींनी बांधलेली ही राखी हे माझे सुरक्षा कवच व ढाल आहे. त्यामुळे कोणी माझे काहीही वाकडे करू शकत नाही. मी यापुढेही महाराष्ट्रात फिरणार आहे. आत्तापर्यंत एवढ्या प्रचंड संख्येने माता-भगिनी मला पहिल्यांदा भेटायला आल्या, याचा मला विशेष आनंद आहे. या स्त्रीशक्तीचे मी मनापासून आभार मानतो.

*पुणे जिल्ह्यातील भगिनींच्या खात्यात शनिवारी पैसे*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची रक्कम राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 90 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून उद्यापर्यंत हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे गेलेला असेल. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील महिलांच्या बँक खात्यात उद्या (शनिवारी) प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झालेले असतील, अशी माहिती पवार यांनी दिली.

*’ओवाळणी परत घेण्यासाठी नसते’*

Advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांचा पवार यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. ही योजना निवडणुकीपुरती नाही. योजनेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील माता-भगिनी व जनतेच्या आशीर्वादाने महायुती पुन्हा सत्तेत येऊन पुढील पाच वर्षे देखील ही योजना सुरू राहील. एकदा दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

महायुती शासनाने महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण अशा विविध घटकांसाठी घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णय यांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी भाषणात दिली. मुलींना मोफत उच्च शिक्षण, 52 लाख कुटुंबांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर, शेतकऱ्यांना वीज पंपांसाठी मोफत वीज, ई- रिक्षा, युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

मावळच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा आमदार दिल्यामुळे आत्तापर्यंत तालुक्याला विविध विकासकामांसाठी तब्बल 2600 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही आम्ही सोडवतोय. मावळ प्रमाणेच महाराष्ट्राचाही आम्हाला कायापालट करायचा आहे. सर्वांगीण विकास करायचा आहे. महाराष्ट्रातील गरिबी घालवायची आहे.केंद्राचा पैसा आणायचा आहे. त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद व पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

*भगिनींच्या प्रेमामुळे सुनिल आण्णा झाले भावूक*

आमदार सुनिल शेळके यांनी विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उठून आमदार शेळके यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सावरण्यासाठी मदत केली. मावळच्या जनतेने साडेचार वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवला,तो मी सार्थ करुन दाखवला, असे नमूद करत आमदार शेळके यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. जल जीवन मिशनचे काम तालुक्यात सुरू असले तरी काही अधिकारी व ठेकेदारांनी काम अर्धवट केले आहे, अशी तक्रार शेळके यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. अर्धवट योजना सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी पवार यांना विनंती केली.

अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली. मावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे तोपर्यंत माझ्या विश्वास ठेवा, असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी यावेळी केले.

जनसन्मान यात्रा व रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page