“उठा, जागा आणि लक्ष्यप्राप्ती होईपर्यंत थांबू नका” : बाळा भेगडे यांचा भाजप कार्यकर्त्यांना मंत्र मावळ भाजपच्या मासिक बैठकीत जनगणना, मतदार यादी पुनर्नरीक्षणासह संघटन बळकटीवर भर

SHARE NOW

मावळ :

 

भारतीय जनता पक्षाच्या मावळ तालुका शाखेची मासिक आढावा बैठक सोमवार (दि. १ जून) रोजी पक्ष कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच जनगणना, घरगणना आणि मतदार यादी पुनर्नरीक्षण या महत्त्वाच्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

 

बैठकीस मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश दिला. “उठा, जागा आणि लक्ष्यप्राप्ती होईपर्यंत थांबू नका” हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मसात करून समाजाच्या हितासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

येणारा काळ भारतीय जनता पक्षासाठी आणि समाजासाठी नवी दिशा देणारा ठरणार असून, तळागाळातील नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधत संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जनगणना व घरगणना ही शासनाच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून मतदार यादी पुनर्नरीक्षण मोहिमेत पात्र नागरिकांची नावे नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

 

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पक्ष संघटनेने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Advertisement

 

या बैठकीस भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, बाबुराव वायकर, सुरेखाताई जाधव, गुलाबकाका म्हाळसकर, शांताराम कदम यांच्यासह लोणावळा, तळेगाव आणि वडगाव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले.

 

प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नांवर भर

 

बैठकीनंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणांचा आढावा घेत प्रशासनाने विशेष बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी भेगडे यांनी केली. शेतकरी आणि नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत तसेच त्यांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, या मासिक बैठकीमुळे आगामी काळातील भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासाच्या मुद्द्यांसाठी पक्ष संघटना अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page