पवन मावळ तालुक्यात अवैध दारू बनविण्याच्या ठिकाणांवर पोलीसांची धाड,लाखो रुपयांचे कच्चे रसायन जप्त
मावळ :
मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणावर शिरगाव परंदवडी पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन जप्त करण्यात आले
पहिल्या कारवाईत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत एक महिला अवैध रित्या दारू बनवत असल्याचा सुगावा शिरगाव परंदवडी पोलिसांना लागला त्यानंतर या ठिकाणावर पोलिसांनी धाड टाकली असता सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन आढळून आले.पोलीसांची चाहूल लागताच संबंधित महिला तेथून पळून गेली
या प्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सागर देवीदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राधिका कुमार नानावत (रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव गावच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या एका खड्ड्याजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन भिजत घातल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित महिला तेथून पळून गेली. घटनास्थळावरून सुमारे १.४० लाख रुपये किमतीचे रसायन जप्त करण्यात आले. पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत पवनमावळातील ओझर्डे गावाच्या हद्दीत पवना नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू बनविण्याच्या ठिकाणावर पोलिसांनी धाड टाकली व मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित कच्चे रसायन जप्त केले. या कारवाईत सुमारे ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचे रसायन आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित महिला आरोपी घटनास्थळावरून पसार झाली.
या प्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शुभम गणेश राजगुरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसऱ्या कारवाईत पवनमावळातील शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू बनविण्याच्या ठिकाणावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे गुळमिश्रित कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित महिला घटनास्थळावरून फरार झाली.
या प्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनिल सुनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा एकूण तीन कारवायांमध्ये शिरगाव परंदवडी पोलीसांकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे
या सर्व प्रकरणांचा पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करत आहेत.






