कर्तव्याच्या वाटेवर मृत्यूची धडक; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी अंत कान्हे फाटा येथे भीषण अपघात; मंचर परिसरावर शोककळा

SHARE NOW

कान्हे : देशाच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना घडवणारी आणि शासकीय जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडणारी एक कर्तव्यदक्ष शिक्षिका काळाच्या पडद्याआड गेल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली. जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना भरधाव कंटेनरच्या भीषण धडकेत शिक्षिका दीपाली सुजित तांबे (रा. मंचर, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मंचर परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या व्यवसायाने शिक्षिका होत्या. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासोबतच त्या विविध शासकीय जबाबदाऱ्याही प्रामाणिकपणे पार पाडत असत. सध्या त्यांच्यावर जनगणनेच्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याच कामासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, कान्हे फाटा परिसरात नियतीने त्यांच्यावर क्रूर घाला घातला.

Advertisement

दीपाली तांबे या त्यांच्या वाहनाने प्रवास करत असताना एका भरधाव आणि अनियंत्रित कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात पाहताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातग्रस्त कंटेनर आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

एका हसतमुख, सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मंचर परिसरात शोककळा पसरली आहे. “कर्तव्य बजावत असतानाच एका शिक्षिकेचा असा अंत व्हावा का?” असा भावनिक सवाल नागरिक आणि शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे. दीपाली तांबे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समाजाने एक आदर्श शिक्षिका गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page