विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण संपन्न

SHARE NOW

मावळ :

 

आगामी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, महसूल सेवक तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे व्यापक प्रशिक्षण विशाल लॉन येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मतदार याद्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

प्रशिक्षणामध्ये मतदारांचे मॅपिंग करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नोंद तपासणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी घरभेटी दरम्यान कोणती खबरदारी घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी कशी करावी तसेच नागरिकांशी समन्वय साधून कामकाज कसे करावे याबाबतही सूचना करण्यात आल्या.

Advertisement

तसेच २० जूनपासून लागू होणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेनंतर करावयाच्या कामकाजाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्याची पद्धत, नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारणे, नोंदींची पडताळणी करणे तसेच अहवाल सादर करण्याची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मतदार याद्या अद्ययावत ठेवणे ही लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची जबाबदारी असून प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने व काटेकोरपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विक्रम देशमुख, अमोल पाटील, अशोक साबळे, प्रविण निकम, गिरीश दापकेकर, चेतन कोंडे तसेच सेवक थोरात उपस्थित होते.

 

प्रशिक्षणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, महसूल विभागातील कर्मचारी, नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी, निवडणूक शाखेतील कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध शंका उपस्थित करत कामकाजाबाबत माहिती घेतली. आगामी काळात मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page