तळेगाव दाभाडे येथील मरिमाता मंदिर परिसरात हातभट्टीचा बेकायदेशीर धंदा पुन्हा तेजीत:प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे शहरातील घोरावाडी रेल्वे स्टेशन परिसरातील मरिमाता मंदिराजवळ बेकायदेशीर हातभट्टी दारू व्यवसाय पुन्हा एकदा जोरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण धंदा एका महिलेच्या नेतृत्वाखाली सुरू असून, प्रशासनाच्या वारंवार इशाऱ्यांनंतरही तिची धाडसी भूमिका कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

या अनधिकृत व्यवसायामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी मावळ दर्पण,सह्याद्री नामा,

सतर्क महाराष्ट्र या न्यूज च्या माध्यमांतून या प्रकरणी आवाज उठवण्यात आला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा धंदा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, ती कारवाई केवळ दिखाऊ ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे.

 

सुमारे सहा दिवसांपूर्वी नगराध्यक्ष आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटिल) व अनेक नगरसेवक . सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्या वेळी संबंधित ठिकाणी धाड टाकून हा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत दिलेल्या या निर्देशानंतर नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

Advertisement

 

परंतु, प्रत्यक्षात हा धंदा केवळ एक दिवस बंद राहिला आणि त्यानंतर पुन्हा पूर्ववत सुरू झाला. यामुळे प्रशासनाच्या कारवाईच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, या व्यवसायाला पोलिसांचे तसेच काही राजकीय घटकांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा जोर धरत आहे.

 

खाकी आणि खादीचा सन्मान राखला जाईल. अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसत असल्याने प्रशासनाबद्दल अविश्वास वाढत आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिला पोलीस व स्थानिक नेत्यांचेही ऐकत नसून, त्यांच्या नजरेसमोरच हा व्यवसाय सुरू ठेवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

या सर्व घडामोडींमुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण होत आहेत. कायद्याला आव्हान देणाऱ्या या धाडसी भूमिकेमुळे काही नागरिक त्या महिलेला धाडसी म्हणत असले तरी, हे वास्तव समाजासाठी कितपत योग्य आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

 

आता तरी पोलिस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करून या बेकायदेशीर धंद्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page