सोमाटणे फाट्यावर गाजणार कुस्तीचा फड गुरुकुल आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात उन्हाळी शिबिराचा दिमाखात शुभारंभ
सोमाटणे :
पुढील पिढीतील कसदार मल्ल घडवण्यासाठी आणि कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी सोमाटणे फाटा येथील गुरुकुल आंतरराष्ट्रीय शंकर कंधारे कुस्ती संकुल सज्ज झाले आहे. या संकुलात आयोजित विशेष उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शुक्रवार, १ मे रोजी मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते व गुरुकुल तालमीचे वस्ताद पै. शिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी अनुभवी मार्गदर्शक वस्ताद पै. शंकर मोहिते आणि वस्ताद पै. अमर एकशिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे प्रशिक्षण शिबीर विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असून यात मावळ तालुक्यासह हवेली, मुळशी, खेड, अहमदनगर, सांगली, मुंबई आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांतील ५१ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हे शिबीर पूर्णतः निवासी स्वरूपाचे असून १ मे ते ३० मे अशा महिनाभराच्या कालावधीत विद्यार्थी कुस्तीचे बारकावे शिकणार आहेत. केवळ मैदानी खेळावर मर्यादित न राहता, या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा आणि व्यायामाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय मल्ल शंकर कंधारे यांनी स्थापन केलेल्या या गुरुकुल केंद्रात खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट, भव्य माती आखाडा, सुसज्ज जिम आणि प्रशस्त क्रीडांगणाचा समावेश आहे. दररोज पळणे, जोर-बैठका आणि कुस्ती सरावासोबतच मानसिक बल वाढवण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा सरावही नित्यनेमाने घेतला जातो. याच मातीने आजवर मावळ केसरी कुमारी सावरी सातकर, राष्ट्रीय खेळाडू अनुष्का दहिभाते, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड आणि राष्ट्रीय खेळाडू पार्थ कंधारे असे अनेक दिग्गज खेळाडू देशाला दिले आहेत.
या उद्घाटन समारंभाला शाईराज दहिभाते, हरिदास डुकरे, नितीन सातकर, दिलीप नखाते, उमेश मोटे, प्रभाकर तुमकर, रवी नागवडे, सुनील सवासे, राजू लष्करी, राहुल भेगडे, सागर खांडभोर यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल घडतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.






