देहूरोड हादरलं! सलग दुसऱ्या वर्षी गोळीबारात रेड्डी बंधूंचा अंत – शहरात भीतीचं सावट

SHARE NOW

देहूरोड (दि. २८): मंगळवारी रात्री देहूरोड शहरात घडलेल्या थरारक गोळीबाराने संपूर्ण परिसर दहशतीखाली आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या निर्दयी गोळीबारात भाजपचे स्थानिक कार्यकर्ते रमेश रेड्डी (वय ४३, रा. गांधीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रेड्डी हे आपल्या मित्रासोबत खरेदीसाठी बाजारात आले असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक जवळून गोळ्यांचा वर्षाव केला.

या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेड्डींना तातडीने आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपासणीसाठी मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

Advertisement

या घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली असून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गांधीनगर व आंबेडकर नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तपास विविध अंगांनी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेला गंभीर पार्श्वभूमी असल्याचेही समोर येत आहे. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेड्डी यांचे भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी यांचीही अशाच पद्धतीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

एकूणच, सलग घडणाऱ्या या रक्तरंजित घटनांमुळे देहूरोड पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत सापडले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page