शौर्य दाखवणाऱ्या अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे वाढत्या उष्णतेमुळे व काहींच्या निष्काळजीपणामुळे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. एका बंद घरात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने दरवाजा तोडून आत प्रवेश करत मोठ्या धाडसाने आग नियंत्रणात आणली. दुसऱ्या ठिकाणी वाळलेल्या गवताला लागलेली आग काही क्षणांत आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.
तसेच, तळेगाव-चाकण महामार्गावरील भारत पेट्रोलियमजवळ उभ्या असलेल्या डिझेल टँकरला अचानक आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करून ही भीषण आग विझवली आणि परिसरातील नागरिकांचे तसेच पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान टाळले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलातील सर्व कर्मचारी व अधिकारी श्री. संतोष तेलगे यांनी दाखवलेले धाडस, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे.
या सर्व शूर वीरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आमचा सलाम.






