रमाकांतनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, दि. १४ एप्रिल :

तळेगाव दाभाडे येथील रमाकांत तरुण मंडळाच्यावतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रमाकांतनगरमधील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व धम्मपूजा, धम्मस्तुती करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विचारांवर आधारित लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी भाषणे केली. कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकता, शिक्षणाचे महत्त्व आणि समता यांचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्पही केला. यावेळी उद्योजक प्रशांत भागवत, नगरसेविका सोनाली दरेकर, उद्योजक गोरख भोसले, निलेश भोसले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक महोत्सव समितीचे सुहास गरुड, माजी नगरसेवक विजयराव गरुड, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संजोक्ता आगळे, सचिव प्रतिभा घोडके, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुशील गरुड, विजय आगळे, शशिकांत गरुड, प्रतीक आगळे, माजी अध्यक्ष मनोज आगळे, धीरज आगळे, प्रथम आगळे, संदीप गरुड, तन्मय गरुड, आदी उपस्थित होते.

Advertisement

माजी नगरसेवक गरुड म्हणाले, की डॉ. बाबासाहेब यांच्या पदव्या बघितल्या तरी त्यांची उंची कळते. सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. ते एका विशिष्ट समुदायापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण समाजात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते.

सुहास गरुड म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ तसेच समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य तथा दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी खरी चळवळ उभारली. तसेच महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.

प्रशांत भागवत म्हणाले, की संघर्षाचा, न्यायाचा दिवस साजरा करण्याचा हा दिन आहे. तळेगावला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

सुरेश झेंड म्हणाले, गरिबी, अन्याय असतानाही हार मानली नाही. शिक्षणाच्या जोरावर त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शिका संघटित व्हा, हा नारा दिला.

सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी, तर आभार मनोज आगळे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page