परांजपे विद्यामंदिरात बाल आनंद मेळाव्याची धमाल; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद”
तळेगाव दाभाडे :

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे प्रशालेमध्ये शनिवार (दि. 14 मार्च 2026) रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणारा हा उपक्रम पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रंगतदार ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ. शैलजा कैलास काळोखे, सौ. अश्विनी संतोष शेळके तसेच माजी तहसीलदार रामभाऊ माने उपस्थित होते. यावेळी शिक्षक प्रतिनिधी संपत गोडे, आशा आवटे, ज्येष्ठ अनिता नागपुरे, अध्यापक राम कदमबांडे, दिलीप हेरोडे, दत्तात्रय ठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या अध्यापिका सौ. रुपाली सरोदे मॅडम यांनी केले. नगरसेविका सौ. शैलजा काळोखे यांनी मनोगत व्यक्त करत बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला चालना देणारा उपक्रम असल्याचे सांगितले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. अश्विनी शेळके, सौ. शैलजा काळोखे आणि रामभाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्यात प्रत्येक वर्गाने स्वतंत्र स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवून व्यवसायाची प्राथमिक ओळख अनुभवली. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रभा काळे मॅडम यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या बाल आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला.






