मावळ तालुक्यात बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात! इंद्रायणी कॉलेज केंद्रावर 2294 विद्यार्थी
तळेगाव दाभाडे :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रमुख परीक्षा केंद्र असून, या केंद्रावर एकूण 2294 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत.
या केंद्रावर विज्ञान शाखेचे 942 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 946 विद्यार्थी, कला शाखेचे 375 विद्यार्थी तसेच तंत्रशिक्षण विभागाचे 31 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. याशिवाय मावळ तालुक्यातील पंडित नेहरू विद्यालय कामशेत, पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर आणि व्ही. पी. एस. कॉलेज लोणावळा या इतर केंद्रांमधूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून, तालुक्यातून एकूण सुमारे 4500 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.
आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता परीक्षा सुरू झाली असून इंग्रजी विषयाचा पहिला पेपर शांततेत पार पडला. संपूर्ण केंद्रावर अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पडत असून, कुठल्याही प्रकारचा गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडलेला नाही.
महाराष्ट्र शासन व बोर्डाच्या वतीने राबवण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षेचे वातावरण अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध राहिले आहे. कुठल्याही प्रकारे कॉपी करण्याचे प्रसंग घडत नाहीत, ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे. विद्यार्थीही मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात असून, उत्साहपूर्ण आणि तणावविरहित वातावरणात परीक्षा देत आहेत.
बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रामदास आप्पा काकडे साहेब, संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे साहेब, खजिनदार सौ. निरूपाताई कानिटकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेसाठी सर्व शिक्षकांनी उत्तम प्रकारे नियोजन करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले हे जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. मावळ तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी मा. सौ. शिल्पा रोडगे या पर्यवेक्षक म्हणून बोर्डाच्या परीक्षेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने पाहत आहेत.
एकंदरीत मावळ तालुक्यात बारावी बोर्ड परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






