“तळेगाव दाभाडे येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा” “हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग”
तळेगाव दाभाडे (वार्ताहर) –
तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व भक्तिभावाने संपन्न झाला.
जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. नथुराम महाराज जगताप पाटील यांनी केले. पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन व किर्तन असे कार्यक्रम पार पडले.
यामध्ये श्रीकृष्ण जन्म कीर्तन ह.भ.प. डॉ. यशोधन किसन महाराज साखरे तर काल्याचे कीर्तन ह.भ.प. संपत महाराज सुरासे यांनी केले. त्यानंतर आरती व महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला.
दुपारी विठ्ठल मंदिरापासून पालखी सोहळ्याने ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. दिंडीत विणेकरी, भजनकरी, टाळकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रदक्षिणेचा समारोप मंदिरात महाआरती करून झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे (अध्यक्ष) व विश्वस्त ह.भ.प. बाळकृष्ण आरडे, यतीन शहा, हरिदास वनारसे, देवराम महाराज खराटे, नारायण धामणकर, विलास गायकवाड, शेखर गुंड, प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे आदींनी केले. यासाठी सेवेकरी, भजनकरी व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.






