सहारा वृद्धाश्रमाचे कार्य प्रेरणादायी,अभिनेते सयाजी शिंदे
ताथवडे :
मावळ तालुक्यातील कुसवली या आदिवासी गावात असणाऱ्या सहारा वृद्धाश्रमात १४ निराधार आजी-आजोबांचा विनामूल्य सांभाळ केला जातो. सहारा वृद्धाश्रमाचे कार्य लक्षात घेऊन पुण्यातील ग्रीन आईज ऑर्गनायझेशन या पर्यावरणावर काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सहारा वृद्धाश्रमास प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की निराधारांना आधार देण्याचे सहारा वृद्धाश्रमाचे कार्य प्रेरणादायी आहे. निराधार होणे पूर्वी अपघाताने अपवादत्मक स्वरूपात दिसून यायचे परंतु अलीकडे नवीन पिढी जाणीवपूर्वक आपल्या मातापित्यांना निराधार बनवत असल्याची चिंता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.ताथवडे येथे झालेल्या कार्यक्रमात सहारा वृद्धाश्रमास समाज रत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह. मानपत्र आणि अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे. चित्रपट अभिनेत्री व ग्रीन आईज कंपनीच्या प्रमुख आर्या घारे. कामगार नेते इरफान सय्यद. सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.






