रेल्वेच्या कामामुळे हायवा वाहतूक वाढली. तळेगाव स्टेशन चौक ते घोरावाडी मार्गावरील नागरिकांना अपघाताचा धोका. सुहास गरुड यांनी पोलिसांकडे केली कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे:
लोणावळा ते पुणे दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गीकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम भराव टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी तळेगाव डेपोसमोरील रेल्वेच्या परिसरातून हायवा मधून मुरूम माती वाहतूक होत आहे. यामुळे तळेगाव स्टेशन चौक ते घोरावाडी रस्त्यावर चिखल पसरला आहे. अनेक पादचारी व दुचाकी स्वरांना या चिखलाचा त्रास होत आहे. नागरिक आणि वाहन चालकांना हा रस्ता धोकादायक झाला असून दररोज अनेक हायवा प्रचंड वेगाने धावताना दिसत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल धूळ पसरली असून अपघाताचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच रस्त्याने अनेक शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिक जात येत असतात. या हायवा वाहनांचा वेग आणि रस्त्यावर असणारा चिखल यामुळे अपघात होऊ शकतो अशी भीती अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण? या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना लेखी निवेदन देण्यात आले असून या मार्गावरील हायवा वाहतूक तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी प्रशासनाने तत्काळ मार्गदर्शन करून हायवा वाहतुकीचा मार्ग बदलावा असे मत सुहास बळीराम गरुड( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष) कुणाल शंकरराव आगळे( तळेगाव शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम(आप्पा) गरुड. सामाजिक कार्यकर्ते सारंग आगळे या निवेदनकर्त्यांनी व्यक्त केले आहे.






