नव्या संशोधनांतून समृध्द भारत घडेल – रामदास काकडे*
तळेगाव दाभाडे: स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढील समस्या वेगळ्या होत्या, आव्हाने वेगळी होती. आज आव्हानांचे स्वरूप बदललेले आहे, प्रश्न वेगळे आहेत या सर्वांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला अनेक नवी संशोधने पुढे आणावी लागतील आणि संशोधनाच्या बळावर भारताला महासत्ता बनवणे आपल्याला शक्य होणार असल्याचे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक रामदासजी काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री काकडे बोलत होते.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित ७५ वा प्रजासत्ताक दिन संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, सदस्य विलास काळोखे, संजय साने, निरुपा कानिटकर, प्रशांत गाडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना काकडे म्हणाले की, यश हे एका दिवसात मिळत नसते तर त्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करावी लागते. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक यश संपादन करावे आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. आज स्वातंत्र्य, समता आणि बंधुता घटनेतील तत्वांवर सामजिक भारत उभा असताना या मूल्यांची जपणूक करण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे.प्रजासत्ताक दिन ही जबाबदारीची जाणीव करुण देणारा स्मरण दिन आहे असे म्हणल्यास योग्य ठरेल असेही काकडे म्हणाले.आज आपला मावळ तालुका सगळ्याच बाबतीत पुढे आहे.पर्यटन, उद्योग व्यवसाय, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मावळ तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे इथला प्रत्येक विद्यार्थी हा कुशल मनुष्यबळ म्हणून पुढे यायला हवा आणि यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे असे काकडे म्हणाले.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून भारताच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची शिस्त आणि प्राध्यापकांची गुणवत्ता या दोनच गोष्टी भारताला भविष्यात महासत्ता बनवू शकतील त्यामुळे सर्वांनी प्रयत्नपूर्वक कष्ट करणे गरजेचे असल्याचे मत शेटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी केले.
संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली तसेच यंदाचा प्रजासत्ताक दिनही ७५ वा असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे सांगत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रगतीत संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा यावेळी उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी युवा उद्योजक प्रशांत गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना आपला खडतर प्रवास सांगत यशासाठी प्रेरक असे मार्गदर्शक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुश्राव्य असे राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आर.आर. डोके यांनी केले. याप्रसंगी प्रध्यापक, शिक्षकेतकर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.






