शाळांचा पहिला दिवस ठरला आनंदोत्सव नवीन विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी; पाठ्यपुस्तकांचे वितरण

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (ता. 15) नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शाळा क्रमांक 1 ते 7 मधील सुमारे दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा किलबिलाटाने गजबजून गेली. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व शाळांमध्ये विशेष प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.

 

पीएम श्री संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक 6 येथे शिक्षण समितीच्या सभापती भारती धोत्रे, सदस्य डॉ. ऋतुजा भगत व सिया चिमटे, सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, पालक समिती अध्यक्ष योगेश ओव्हाळ आणि स्पोकन इंग्लिश तज्ज्ञ अमिन खान या मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Advertisement

 

मुख्याध्यापक संजय चांदे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेतला. यंदा दहावीच्या पहिल्याच बॅचने शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक संचांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.

 

विद्यार्थीसंख्या वाढत असल्याने लवकरच शाळेसाठी आवश्यक संख्येने कंटेनर वर्ग उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय स्पोकन इंग्लिश, अबॅकस, विविध क्रीडा उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रमही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती भारती धोत्रे यांनी दिली. नगरसेविका सिया चिमटे आणि डॉ. ऋतुजा भगत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लहू पिंपळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक डॉ. संतोष शिंदे यांनी केले.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page