श्रीरंग कलानिकेतन चा ४१ वा वर्धापन दिन संपन्न डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल….
तळेगाव दाभाडे :
रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी मावळ परिसरातील शास्त्रीय संगीत क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीरंग कलानिकेतन संस्थेचा ४१ वा वर्धापनदिन वनश्री नगर येथील संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला..
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्यमान शिक्षण समिती सभापती मा.भारतीताई धोत्रे या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होत्या.
मा.भारतीताई धोत्रे, संस्थेचे विश्वस्त विश्वास देशपांडे, बागेश्रीताई लोणकर, अध्यक्ष राजीव कुमठेकर, सचिव विनय कशेळकर, दिपक आपटे व डॉ. पौर्णिमा धुमाळे या मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी ‘श्रीरंग’च्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तसेच लवकरच श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने गायन व नृत्यकलेचे वर्ग सुरु करणार असल्याचे सांगितले.
श्रीरंग कलानिकेतनला सभागृह सुशोभित करण्यासाठी आणि संगीत प्रशिक्षणासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने सर्व प्रकारची मदत करू असे मनोगत मा.भारतीताई धोत्रे यांनी व्यक्त केले. श्रीरंग कलानिकेतनच्या संगीत क्षेत्रातील कार्याचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर गायनाची मैफल सुरु झाली. डॉ.पौर्णिमा धुमाळे यांनी त्यांच्या सादरीकरणात राग कोमल रिषभ आसावरीमध्ये बडा ख्याल ‘आली री सुन’
विलंबित झुमरा तालात, छोटा ख्याल ‘पिया को मिलाओ’ मध्यलय तिंतालात आणि छोटा ख्याल ‘जोगीन के भेस’ द्रुत तिंतालात सादर केला. पुढे गौड सारंग रागात बडा ख्याल ‘तोरे कारन जागी’, मध्यलय रुपक मध्ये व छोटा ख्याल ‘पियु पलन लागी’ द्रुतलय तिंतालात सादर करून रसिकांची मने जिंकली.
तबल्याची साथ पुष्कर महाजन आणि संवादिनीची साथ अंशुला मोरे यांनी करून मैफिलीत रंग भरला.
ध्वनी व्यवस्था रसिक साऊंडचे केदार अभ्यंकर यांची होती. श्रीरंग कलानिकेतनच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले..






