तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सन्मान व मार्गदर्शनाने रंगला कार्यक्रम
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक संग्राम जगताप यांच्या हॉटेल ड्रीम लंच येथे आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सन्मान व विचारमंथन झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक , ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे, संस्थापक अध्यक्ष अमीन खान, प्रेस फाउंडेशनचे सल्लागार योगेश्वर माडगूळकर, रमेश जाधव गुरुजी, अध्यक्ष महेश भागीवंत, सचिव केदार शिरसट, पत्रकार परिषद प्रमुख रेश्मा फडतरे ,प्रकल्प प्रमुख रेखा भेगडे, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, डॉ . संदीप गाडेकर, मयूर सातपुते,उद्योजक संग्राम जगताप, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बबनराव भेगडे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेतील स्वातंत्र्य, सत्यतेचे महत्त्व व पत्रकारांची समाजातील जागल्याची भूमिका अधोरेखित केली.पत्रकारिता ही भयापासून, मर्जीपासून आणि सत्याशिवाय अन्य कोणत्याही बाबीपासून मुक्त असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बबनराव भेगडे म्हणाले, मी ही जर्नेलिझम केले आहे.त्यामुळे मला पत्रकारांविषयी आदर आहे. पत्रकारांच्या सर्व अडचणी मी जाणतो, असे सांगून पत्रकारांचे कौतुक केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
विजयकुमार सरनाईक म्हणाले, मराठी पत्रकार दिन हा
आजचा दिवस पत्रकारिता क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या दूरदृष्टीने ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पणच्या रूपाने महाराष्ट्रातील पत्रकारितेचा पाया रचला, त्यांचा वारसा पत्रकारांना आजही प्रेरणा देत आहे.
विजयकुमार सरनाईक यांनी मराठी पत्रकारितेचा ऐतिहासिक वारसा आणि आचार्य जांभेकरांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करून पत्रकारांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.
अमीन खान यांनी एआय तंत्रज्ञानामुळे बदलत असलेल्या पत्रकारितेचे स्वरूप स्पष्ट करत पत्रकारांनी सत्य व नि:पक्षपातीपणे कार्य केल्यास लोकशाही अधिक मजबूत होईल, असे मत व्यक्त केले.
श्रीकृष्ण पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बबनराव भेगडे आणि विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. अमीन खान यांची दै. पुढारीचे ज्येष्ठ उपसंपादकपदी निवड, विलास भेगडे यांची डी. वाय. पाटील कॉलेजच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या मीडिया सदस्यपदी निवड, रेश्मा फडतरे यांची सीआरपीएफ महिला व बालकल्याण कमिटी सदस्यपदी निवड, तसेच डॉ. संदीप गाडेकर व रेखा भेगडे यांचे राष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कार्य या निवडींसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.हरी ओम कन्स्ट्रक्शनचे प्रमुख संग्राम जगताप यांच्या वतीनेही सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
स्वागत महेश भागीवंत यांनी, प्रास्ताविक रेश्मा फडतरे यांनी, सूत्रसंचालन केदार शिरसट यांनी केले. डॉ. संदीप गाडेकर यांनी आभार मानले.