पुणे –बारामती सायकल स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
देहू, :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ,महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार( ता. १९ ) रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे,अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव एडवोकेट संदीप कदम यांनी दिली. स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही क्रीडा स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे.
सायकल स्पर्धा पुढील विविध गटात होणार आहे.
1. पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीयस्तर (१२२ कि.मी.)
2. पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर(१२२ कि.मी.)
3. सासवड ते बारामती MTB सायकलची खुली स्पर्धा पुरुषांसाठी (राज्यस्तर) (८५ कि.मी.)
4. माळेगांव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी.)
5. सासवड ते बारामती (पोलीस /राज्य शासन कर्मचारी)राज्यस्तरीय स्पर्धा (८५ कि.मी.)
6. माळेगांव ते बारामती पोलीस /राज्य शासन कर्मचारी (महिला) राज्यस्तरीय स्पर्धा (१५कि.मी.)
या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४०० ते ४५० सायकलपटू सहभागी होणार आहेत. तसेच राज्य पातळीवरील स्पर्धेत सुमारे ३०० ते ३५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत नवी दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, उत्तराखंड अंदमान निकोबार, चंदीगड या राज्यातील तसेच सेनादल, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, एअर फोर्स, मध्य रेल्वे या (तामिळनाडू) मधील खेळाडू सहभागी होणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
सर्व वयोगटामधील विजेत्यांना एकूण सहा लाख रूपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकांचा प्रवास, निवास व भोजन व्यवस्था सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास राज्य व राष्ट्रीय स्तरावर “घाटाचा राजा” हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्व गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
गत वर्षीच्या स्पर्धेत (कंसात अंतर व नोंदवलेली वेळ)
पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२२ कि.मी.) स्पर्धेमध्ये एअर फोर्सच्या मनजित सिंग (२.३३.५५) याने प्रथम क्रमांक, पुण्याच्या सुर्या थत्तु (२.३७.६०) याने द्वितीय क्रमांक तर विजय पूरचा श्रीशैल विरापुर (२.३९.२७) याने पटकावला. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राज्य स्तर – १२२ कि.मी. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या सिद्देश पाटील याने (२.३७.३१) पुण्याचं हनुमान चोपडे याने द्वितीय क्रमांक (२.३८.२९) याने आणि तृतीय क्रमांक जतच्या दत्तात्रय चौगुले (२.३८.३५) याने प्राप्त केला. राष्ट्रीय स्तरावर ‘घाटाचा राजा’ हा किताब सूर्या थत्तु याने तर राज्य स्तरावर कोल्हापूरच्या सिद्देश पाटील यांनी पटकवला होता.
समाज प्रबोधन व समाजाला संदेश देण्याकरिता शनिवारवाडा ते हडपसर पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. आरोग्य, वाहतूक, पर्यावरण व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्याला आळा घालण्यासाठी व तो प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. सदर रॅलीमध्ये सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून पर्यावरण संदेश, प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश दिला जाणार आहे. सदर रॅली ही सर्वांसाठी खुली असून त्यामध्ये ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार असून लोकांना सायकलचा वापर जास्तीत जास्त करून वाहतूक व पर्यावरणाचा समतोल राखावा याबद्दल संदेश देऊन अवाहन करणार आहेत.
स्पर्धेचा उद्घाटन सकाळी ८.०० वा. शनिवारवाडा येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, एशियन सायकलिंग कॉन्फडरेशनचे महासचिव ओंकार सिंग, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, पार्थ पवार, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संजय साठे त्याचबरोबर स्थानिक आमदार, कार्यकर्ते, सिनेअभिनेते, अभिनेत्री तसेच सर्व सन्माननिय मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पुणे (हडपसर) ते बारामतीमुख्य स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९.०० वा. हडपसर (ग्लायडिंग सेंटर) येथे उद्योजक सतिश मगर, मा. आयर्न मॅन आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव, आमदार मा. चेतन तुपे यांचे शुभहस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक सुनिल बनकर उपस्थित राहणार आहेत .
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ग.दि.मा. सभागृह, बारामती येथे दु. २.३० वा. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुनेत्राताई पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास खा. सुप्रियाताई सुळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा. प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळीपुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव यांनी सायकल रॅली आणि स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलेले आहे.






