पीएमआरडीएच्या अन्यायकारक नगररचना योजना व रिंग रोड रद्द करण्यासाठी बाळाभाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बैठक
तळेगाव दाभाडे – पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या नेरे, सांगवडे, दारुंबरे, साळुंबरे, गोडुंबरे आणि धामणे या गावांमधील नगररचना योजना तसेच ६५ मीटर रिंग रोड (नेरे ते उरसे) या दोन्ही योजना रद्द करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत वरील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, नगररचना संचालक अविनाश पाटील, तसेच सहसंचालक श्वेता पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना बाळाभाऊ भेगडे म्हणाले,
“या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. सुमारे २१०० एकर बागायती जमीन या प्रकल्पांमध्ये बाधित होत असून, ही शेती शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. कुठल्याही परिस्थितीत या योजना आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत या योजना पूर्णपणे रद्द होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरू राहील आणि मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन.”
तसेच त्यांनी आश्वासन दिले की, लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी बांधवांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत थेट चर्चा केली जाईल.
या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नगररचना योजना व रिंग रोड रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.






