*मावळातील शिक्षक आक्रमक* : *संच मान्यता व टीईटी सक्तीविरोधात आंदोलनात मावळातील 450 शिक्षक सहभागी*
तळेगाव दाभाडे : 5 डिसेंबर: राज्यातील शिक्षकांवरील वाढता ताण, अनिर्णित प्रश्न आणि शिक्षणव्यवस्थेतील सुरू असलेल्या अडचणीबाबत शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या असून, पुण्यात आंदोलनाला मोठा वेग मिळत आहे. संच मान्यता प्रक्रियेतील अडथळे आणि टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) सक्तीविरोधात विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत आज जोरदार निदर्शने केली.

अशैक्षणिक कामांच्या वाढत्या बोजामुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्ष स्नेहल बाळसराफ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. “शाळांमध्ये शिक्षकांकडून निवडणुका, विविध सर्वेक्षणे, शासकीय मोहिमा आणि प्रशासकीय कामे करून घेतली जातात. परिणामी प्रत्यक्ष अध्यापनाचे तास कमी होतात आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते,” असे बाळसराफ म्हणाले.
आंदोलनात राज्यभरातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले होते. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राज्य शिक्षकेतर संघाचे सरचिटणीस शिवाजीराव खांडेकर, सचिव नंदकुमार सागर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव होळकर, विजयराव कोलते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे विभागाचे प्रतिनिधी, शिक्षण संस्थाचालक महामंडळ, पंकज घोलप (अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ), प्रसाद गायकवाड (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ), शिवाजीराव कामठे (सचिव मुख्याध्यापक संघ), स्नेहल बाळसराफ (अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ), तानाजी झेंडे (कार्यवाह, पुणे जिल्हा TDF) आणि प्रदीप गाढवे (खजिनदार, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघ) यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, टीईटी सक्ती मागे घेतली जावी, संच मान्यता प्रक्रिया सुलभ करावी आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला असून, सरकारने तत्काळ लक्ष न दिल्यास व्यापक स्तरावर राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची भूमिका घेतली आहे.






