सेवानिवृत्तीनिमित्त एसीपी श्री संभाजी बनसोडे यांचा वृंदा गुरुकुल फाउंडेशनतर्फे सन्मान

SHARE NOW

मुंबई : मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) श्री संभाजी बनसोडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात वृंदा गुरुकुल फाउंडेशनतर्फे त्यांचा व त्यांच्या पत्नींचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य श्री उद्धव होळकर व सौ. लक्ष्मी होळकर तसेच संचालक प्रा. रुपेश फोंडे व सौ. सौरभी फोंडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त श्री शिरीष जैन, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री उद्धव होळकर यांनी श्री संभाजी बनसोडे यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. सांगली जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातून अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर पोलीस खात्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे त्यांनी कौतुक केले. उच्च पदावर कार्यरत असतानाही आपल्या गावाशी, मातृभूमीशी आणि बालपणीच्या मित्रांशी जपलेले नाते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

श्री संभाजी बनसोडे यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसेवेची भावना जपत उत्कृष्ट कार्य केले. पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख कार्यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि प्रतिष्ठित मंचांकडून त्यांचा वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे.

Advertisement

 

विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कोविड काळातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले असून अनेक पुरस्कार व गौरवचिन्हांनी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण अधोरेखित होतात.

 

या प्रसंगी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सेवा निवृत्तीनंतरही विविध क्षेत्रांत नवीन करिअर घडविण्याच्या आणि समाजासाठी कार्य करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या कारकिर्दीत चांगले-वाईट असे अनेक अनुभव येतात; मात्र आयुष्यातील चांगल्या आठवणी आणि सकारात्मक क्षणांची शिदोरी सोबत घेऊन पुढील वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी श्री संभाजी बनसोडे यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी श्री संभाजी बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पोलीस दलातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सेवाकाळातील अनुभवांना उजाळा देत त्यांनी समाजसेवेची भावना पुढील आयुष्यातही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

या प्रसंगी श्री संभाजी बनसोडे व त्यांच्या पत्नींचा पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्तीचा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page