तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक : प्रशासन सज्ज, दुसऱ्या टप्प्यात शनिवारी मतदान
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी शांततापूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या टप्प्यात शहरातील चार प्रभागांतील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एकूण २० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २ साठी एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे एकूण ६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक ७ साठी माउंट सेंट अॅन हायस्कूलच्या मुख्य इमारतीत ५ केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक ८ साठी नवीन समर्थ विद्यालय येथे ३ तसेच सह्याद्री इंग्लिश स्कूल येथे २ मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १० साठी थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत ४ मतदान केंद्रे असतील. सर्व केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतमोजणी प्रक्रिया रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने सुस्पष्ट नियोजन केले असून २ नोडल अधिकारी, १४ झोनल अधिकारी आणि २८ मतमोजणी सहाय्यक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नगर परिषदेचे ६० कर्मचारी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही प्रशासन सतर्क असून मतदान केंद्रांवर आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दरम्यान, दि. १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार, सभा किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास बंदी राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली. मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






