आळंदी देहू रस्त्यावरील डुडुळगाव ड्रेनेज लाईनचे सांडपाणी रस्त्यावर ; नागरिक त्रस्त

SHARE NOW

आळंदी (प्रतिनिधी ) :

आळंदी येथील डुडुळगाव परिसरातील आळंदी देहू रस्त्यावरील ड्रेनेज लाईनफुटल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे परिसरात दुर्गंध पसरली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदरची ड्रेनेज लाईन पंचरत्न हॉटेल, बीआरटी मार्गालगत दाट लोकवस्ती आणि रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिक या रस्त्याचा वापर रहदारीस करत आहेत.

पंचरत्न हॉटेल समोरील ड्रेनेजचे झाकण तुटल्याने चेंबर मधून सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्त्याला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ यावर तोडगा न निघाल्यास पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा आणू असा खणखणीत इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश तळेकर यांनी नागरिकांचे वतीने दिला आहे. ड्रेनेज लाईन फुटल्याने आणि सांडपाणी तसेच दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. याच भागात गेल्या काही दिवसा पासून पाऊस होत आहे. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांत रोष वाढत आहे. महापालिकेवर सद्या प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची कामे होताना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासन वॉर्ड ऑफिसर यांना वारंवार तक्रार करून देखील जाणून-बुजून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांतून चर्चा होत आहे. येत्या दोन चार दिवसात उपाय योजना न झाल्यास नागरिकांचा मोर्चा पालिकेवर आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक वंदना आल्हाट यांनी नागरिकांचे वतीने दिला आहे.

Advertisement

अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे रस्त्यावर सांडपाणी

गेले काही दिवसा पासून शहरात पाऊस होत आहे. यात आणखी भर ड्रेनेजचे सांडपाणी अनेक वस्त्यां मधील सांडपाणीच्या लाईन तुंबल्या असून ठिकठिकाणी रस्त्यावर सांडपाणी दिसते. या सगळ्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. रहदारीत परिसरातील छोट्या व्यवसायिकांना देखील यांचा फटका बसत आहे. हॉटेल व्यवसायिक तर या दुर्गंधी युक्त पाण्यामुळे हैराण झाले आहेत. हॉटेल मध्ये होणारी गर्दी मात्र या दुर्गंधने कमी झाली आहे. घाण पाण्याचे त्रासाने हॉटेलकडे ये जा करणारे ग्राहक त्रस्त झाले. छोट्या मोठ्या व्यवसायिकांचा रोष प्रशासनावर आहे. या भागातील दुकानदार यांनी पालिकेस तक्रारी करूनही महापालिका प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याने नागरिक ही त्रस्त झाले आहेत.

या संदर्भात संबंधित ठिकाणच्या ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ केले जाईल. अजून काही ठिकाणी तुटलेली चेंबरची झाकणे देखील बदलली जातील. तसेच आरोग्य विभागाचे माध्यमातून इतरही ठिकाणची कामे यावर उपाय योजना केल्या जातील असे कनिष्ठ अभियंता प्रियंका मस्के यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page