०१ मे कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस – श्री. चंद्रकांत शेटे इंद्रायणी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :

“१ मे हा केवळ उत्सव नसून, तो इतिहासाची आठवण आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. महाराष्ट्राने औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. मुंबई आज देशाची आर्थिक राजधानी आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. साहित्य, कला, नाटक आणि चित्रपट या सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे.” असे गौरव उद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी काढले. आज इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या उपप्राचार्या प्रा. अमृता सुराणा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. संस्थेने केलेल्या प्रगतीचा आलेख अधोरेखित करत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तचे औचित्य स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, उपाध्यक्ष श्री संजय साने, श्री शैलेश शहा खजिनदार निरुपा कानिटकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. आर. डोके यांनी केले.






