मावळ शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक! मतदार यादी पुनरनिरीक्षणासाठी बीएलए कार्यकारिणी जाहीर; अमित कुंभार यांच्यावर जबाबदारी
मावळ : शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज अनंत सृष्टी, जांभूळ फाटा येथे सोमनाथ कोंडे यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय मतदार यादीच्या पुनरनिरीक्षण कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मावळ शिवसेनेच्या वतीने बीएलए (Booth Level Agent) कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून मावळ तालुका बीएलए कार्यकारिणी प्रमुख पदी अमित कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांनी सर्व शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, संघटक व विभाग प्रमुखांना त्यांच्या-त्यांच्या भागातून प्रत्येकी १० नावे सुचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच मतदार यादीत नाव कमी होणे किंवा नव्याने नाव समाविष्ट करणे यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार, मावळ तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख व शहर प्रमुखांनी तातडीने शासकीय बीएलओकडून प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचे बारकाईने वाचन करून कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच दुबार, बोगस व बाहेरील राज्यातील मतदारांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, युवासेना तालुका प्रमुख विशाल लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






