कपड्यांच्या दुकानात गुप्त चित्रीकरण: प्रसिद्ध व्यापाऱ्यास अटक
कामशेत : येथील एका कपड्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुली कपडे बदलत असतानाचे गुप्त चित्रीकरण केल्याप्रकरणी कामशेत येथील स्थानिक व्यापारी मुकेश मुथा यास कामशेत पोलिसांनी सोमवारी (६ एप्रिल) अटक केली. या घटनेमुळे कामशेत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास काही मुली बाजारपेठेतील शाळेजवळ असलेल्या मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. कपडे ट्राय करण्यासाठी या मुली दुकानाच्या स्टोअररूममध्ये गेल्या असता, तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्यांचे चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित मुलींनी धाडस दाखवत आरोपी मुकेश मुथा याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, १६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेचा गुन्हा उशिरा का नोंदविण्यात आला?याबाबत शहरात विविध चर्चा रंगत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, तक्रार दाखल करू नये यासाठी पीडित मुलींवर दबाव टाकल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोसरवर करत आहेत.






