छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान,भाजप नगरसेवकाचा बोर्ड तात्काळ हटवा; अन्यथा शिवप्रेमीच हटवतील- संभाजी बारणे यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) दि. १७ मार्च २०२६:– महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, शहरातील शिवप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तानाजी बारणे यांनी स्वतःच्या नावाचा बोर्ड लावला असून या घटनेमुळे शिवप्रतिमेचा अपमान झाल्याचे मत संभाजी बारणे यांनी व्यक्त केले असून महानगरपालिकेने बोर्ड न हटवल्यास शिवप्रेमी हटवतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
बारणे यांनी म्हटले आहे की,संबंधित बोर्ड महानगरपालिकेच्या खर्चातून उभारण्यात आला असून, तो थेट शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यासमोर लावण्यात आला आहे. त्यामुळे पुतळ्याचे दर्शन अडथळित होत असून, महाराजांची प्रतिमा झाकली जात आहे. छत्रपतींच्या नावावर राजकारण करून सत्तेत येणारेच त्यांच्या प्रतिमेचा अपमान करत आहेत.महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याची दखल घ्यावी.
शहरात आधीच विविध प्रश्नांवरून वातावरण तापलेले असताना, या नव्या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शिवाजी महाराजांविषयी असलेली जनतेची भावना लक्षात घेता, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी संबंधित जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे. थेरगाव परिसरामध्ये संतापाची लाट पसरली असून नागरिकांच्या भावनांचा विचार प्रशासनाने करून लवकरात लवकर बोर्ड हटवा असा इशाराही संभाजी बारणे यांनी दिला आहे.






