तळेगाव दाभाडे येथे गुढीपाडव्याच्या निमित्त तीन दिवस मोफत अन्नदान उपक्रम
तळेगाव दाभाडे:
चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९४८ या नववर्षारंभी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरीतील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवाला यंदा सेवाभावाची अनोखी जोड मिळणार आहे. कल्याणेश्वर मंदिराच्या वतीने उत्सवानिमित्त शहरात येणाऱ्या दुकानदार, फेरीवाले तसेच विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविक व नागरिकांसाठी तीन दिवसांची मोफत अन्नदान सेवा आयोजित करण्यात आली आहे.
ही सेवा बुधवार दि. १८ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. २० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून दररोज सकाळी ११.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे येथील चावडी चौक (गणपती चौक) परिसरातील कल्याणेश्वर मंदिर येथे ही अन्नछत्र सेवा भाविकांसाठी खुली राहणार आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर भक्त, व्यापारी, फेरीवाले आणि पर्यटकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर उत्सवात आलेल्या प्रत्येकाला सन्मानाने अन्न मिळावे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. सामाजिक सलोखा, सेवा आणि सहकार्याचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.
या अन्नदान उपक्रमाचे मुख्य व्यवस्थापन व आयोजन कल्याणेश्वर मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ते राजू शंकरराव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविकांनी या सेवेत सहभागी होऊन प्रसादरूप अन्नाचा लाभ घ्यावा, तसेच सेवाभावी कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






