श्रीक्षेत्र देहूगाव व परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण

SHARE NOW

देहूगाव : देहूगाव व परिसरात महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. देहूगाव येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच येलवाडी येथील येलेश्वर मंदिर या ऐतिहासिक मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. शिवभक्तांनी महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, मध आदी पंचामृताचा अभिषेक करून धूप, दीप अर्पण केले तसेच बेलपत्र वाहून भावपूर्ण दर्शन घेतले. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहून भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.

देहूगाव, येलवाडी व चिंचोली परिसरातील महादेव मंदिरांमध्ये महाभिषेक, महापूजा, होमहवन व महाआरती यांसारखे धार्मिक विधी पार पडले. तसेच अनेक ठिकाणी हरिपाठ, पारायण, महिला भजनी मंडळांचे भजन, हरिकीर्तन यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Advertisement

संत परंपरेने पावन झालेल्या या भूमीचे महात्म्य संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून वर्णन केलेले आहे. इंद्रायणी नदी तीरावर वसलेल्या या पुण्यभूमीत सिद्धेश्वर व येलेश्वर या प्राचीन मंदिरांना विशेष धार्मिक महत्त्व असून, महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त येथे उपस्थित राहून पूजा-अर्चा करतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. भक्तीचा महापूर उसळल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले असून, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने देहूगाव व परिसरात पवित्र आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.देवस्थान संस्थान , दानशूर व्यक्ती यांच्या वतीने ,राजगिरा लाडू , खिचडी , केळी , तसेच पाणी शरबत आशा उपासाच्या प्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page