शेतात काम करून डोमेगावचे शेळके दांपत्य भागविताहेत रुग्णाच्या औषधीचा मासिक खर्च

SHARE NOW

अंबड(जालना)/प्रतिनिधी

गावात स्वखर्चाने शौचालये बांधून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविणारे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील सविता शेळके व बाबासाहेब शेळके हे दांपत्य गावातील एका गरीब मानसिक रुग्णाच्या औषधीसाठी दरमहा लागणारा खर्च स्वतः शेतात मोलमजुरीचे काम करून भागवित आहेत.

Advertisement

डोमेगाव येथील मानसिक रुग्ण असलेल्या गणेश अजबराव वराडे याच्या औषधोपचारासाठी कुटुंबियाकडे पैसे नव्हते तेव्हा सदर बाब सविता शेळके यांना कळाल्यानंतर त्यांनी पती बाबासाहेब शेळके यांच्या कानावर टाकली. ग्रामपंचायत कर्मचारी असलेले बाबासाहेब शेळके यांची मदतीची इच्छा होती. मात्र त्यांचा पगार थकलेला असल्याने ते आर्थिक मदत करण्यात असमर्थ ठरले.तेव्हा सविता शेळके यांनी आपल्या अंगावरील दागिने गहाण ठेवून गणेश वराडे यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत करीत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला.वेळेवर औषधोपचार मिळाल्याने वराडे हे रुग्णालयातून बरे होवून घरी परतले. दरम्यान गणेश वराडे यांना सध्या महिन्याकाठी सुमारे 6 हजार रुपयांच्या विविध औषधी लागतात.मात्र ते दरमहा 6 हजार रुपये खर्च करू शकत नाही.रुग्णाला बरं व्हायचं असेल तर त्यासाठी औषधी ही खुप महत्वाची असते ही बाब माहित असल्याने सविता शेळके या औषधी खर्चासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन कापूस वेचणीचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेब शेळके हे ही लोकांच्या शेतात जाऊन कपाशीवर औषधी फवारणीचे काम करत असून या कामातून मिळणारे पैसे शेळके दांपत्य वराडे याच्या दरमहा लागणाऱ्या औषधीसाठी खर्च करत आहेत. अर्थिक परिस्थिती सक्षम नाही असे कारण पुढे करून अनेक जण मदत देण्यापासून पळ काढतात मात्र शेळके दांपत्यांनी स्वतःची अर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने थेट मजुरी करून मदत केल्याने गाव व परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page